Anandraj Ambedkar

उत्साहाचा महामेरूः आनंदराज आंबेडकर

आनंदराज आंबेडकर हे आता एका व्यक्तीचे नाव राहिले नसून एका प्रवाहाचे, एका चळवळीचे नाव म्हणजे आनंदराज आंबेडकर. माता मिराताई आंबेडकर म्हणतात, “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या रिपब्लिकन चळवळीची झालेली वाताहात थांबवण्यासाठीच की काय आनंदराजने रिपब्लिकन सेनेची स्थापना केली असावी.”

एका आईने आपल्या पोटच्या लेकराच्या कार्याचे हे केलेले निरिक्षण आणि परीक्षण आणि त्यातून काढलेला निष्कर्ष अगदी वस्तूनिष्ठ आहे. ‘आनंदराज आंबेडकरांनी आंबेडकरी चळवळीसाठी काय केले?’ असा प्रश्न निर्माण करणाऱ्यांनी एकदा मागे वळून पाहावे. आंबेडकरी चळवळ पूर्ण निराशेत गटांगळ्या खात होती. कुणाचा पायपोस कुणाला राहिलेला नव्हता. एकटे ॲड.बाळासाहेब आंबेडकर चळवळ वाचवण्यासाठी धडपडत होते. समाजात बुद्धीभेद करून बाळासाहेबांना लुंग्यासुंग्यांच्या बरोबरीला आणून बसवणारे लेखणी बहाद्दर व गायक-कलावंत बाळासाहेबांचे वेगळेपण दाखवायला तयार नव्हते.

“पांगलेली तुझी भीमसेना त्यात सरदार कोणी दिसेना,
बीन धन्याच्या या फौजेला आता सारी दुनिया हसू लागली रे”

अशी चळवळीची मांडणी करणे सुरू होते. चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या बेताल वागण्याला कंटाळून त्यांच्या अस्मितेला डिवचण्याच्या हेतूने ॲड.बाळासाहेब आंबेडकरांनी ‘आंबेडकरी चळवळ संपली आहे.’ हे पुस्तक लिहून काही परिणाम होतो का ते पाहिले. त्यावरही ते पुस्तक न वाचताच तथाकथित बाबासाहेबांच्या चळवळीच्या व विचारांच्या ठेकेदारांनी बाळासाहेबांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला.

आंबेडकर कुटुंब इमाने इतबारे बाबासाहेबांच्या कार्याचा हा रथ ओढत असताना त्यांचे कार्य मातीमोल भावाने तोलणाऱ्यांना आंबेडकर कुटुंबातील सर्वच सदस्यांमध्य प्रचंड तेज आहे हे सिद्ध करून दाखवणे गरजेचे होते. म्हणून आनंदराज आंबेडकरांनी प्रथम बौद्धजन पंचायत समिती व नंतर इंदुमिल हे प्रश्न हातात घेऊन चुटकीसरशी सोडवले. तेव्हा लोकांना कळले की, “भीमसेना पांगलेली असली तरी तिला सरदार आहे”, परंतु नेतृत्वाच्या विचाराचा वाहक असणारा मधला वर्ग बेईमान असल्यामुळे या वर्गाने भीमसेनेला खरा सरदार कळूच दिला नाही.

तेव्हा आनंदराज आंबेडकर यांनी मैदानात उडी घेऊन बौद्धजन पंचायत समिती, इंदुमिल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी असे एकानंतर कील्ले सर करायला सुरूवात केली तेव्हा कुठे आंबेडकर कुटुंबाच भीमसेनेचा सरदार आहे अशी किमान समर्थकांनी चर्चा सुरू केली. नसता समर्थकही विरोधकांच्या सुरात सूर हतबल होऊन समाजात निराशाच पेरत होते. काही समर्थक तर ॲड.बाळासाहेब आंबेडकर व सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्यात द्वंद्व असल्याच्याच चर्चा इतक्या चवीने करतात की, त्यांना नेमके काय पाहिजे याचाच थांगपत्ता लागत नाही. विरोधकांची तर बातच निराळी.

‘बाबासाहेबांची औलाद’ म्हणवून घेणाऱ्या विरोधकांची अवस्था तर फारच विचित्र झाली आहे. त्यांच्याकडे लोकांना आकर्षित करण्यासारखे काहीच नसल्यामुळे रिपब्लिकन, बहुजन असले शब्द घेऊन त्यातच वैचारिक उड्या मारण्याचा तडाका लावला, तरी त्यांच्याकडे कोणीच ढुंकुनही पाहायला तयार नाही, तेव्हा आपलेच नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करण्याचेही प्रयोग करून पाहात आहेत तरी बिचाऱ्यांची दखल घ्यायला कोणीच तयार नाही. अशा परिस्थितीत ॲड.बाळासाहेब व सरसेनानी आनंदराज यांचे झंझावाती दौरे सुरू आहेत त्यामुळे समाजात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दि.१८ नोव्हेंबर २०१७ शनिवारी सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा झंझावाती दौरा औरंगाबादच्या नागसेनवनात आहे. सरसेनानी आनंदराजच्या दौऱ्यात काय उत्साह असतो तो ज्यांनी अनुभव घेतला त्यांनाच कळेल.

उद्या सरसेनानी बुलडाणा जिल्ह्यातील घाटबोरी येथे असतील. लोकांना चेतवण्याचे काम सरसेनानी करीत आहेत. ‘सामाजिक जीवन जगणारा समूह उभा राहतोय’ हे निरीक्षण ॲड.बाळासाहेब आंबेडकरांनी २ अॉक्टोबर रोजी नांदेडच्या धम्ममेळाव्यात नोंदवले आहे. म्हणजे ॲड.बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या दिशेने आंबेडकरी समूह आगेकूच करीत आहे. या समूहामध्ये आशावाद, आत्मविश्वास जागवण्याचे काम आनंदराज करीत आहेत. आनंदराज आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या प्रवेशाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये सुद्धा उत्साहच उत्साह निर्माण झाला आहे. ‘उत्साहाचा महामेरूःआनंदराज’ असेच वर्णन संयुक्तिक ठरेल.

मा. श्रीपती ढोले, नांदेड.
“चला राजगृहाकडे” अभियानाचे प्रणेते.