बाबासाहेबांचा शेवटचा संदेश..!

मला कशाचा त्रास होत आहे हे तुम्हा लोकांना माहित नाही माझी पहिली खंत ही आहे की, माझे जीवनकार्य पूर्ण करू शकलेलो नाही. माझे लोक इतर समाजाशी बरोबरीपुर्वक राजकीय सत्तेचे वाटेकरी होऊन सत्ताधारक वर्ग बनलेले पाहण्याची माझी इच्छा  होती, जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा मुठभर सुशिक्षितांनी घेतला आहे. पण त्याचे विश्वासघातकी वागणे आणि दलित शोषितांबद्दलची त्याची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असे म्हणावे लागते. ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेले आहेत. ते फक्त स्वतःसाठी आणि व्यक्तिगत फायद्यासाठीच जगतात. त्यांच्यापैकी एकही सामाजिक कार्य करायला तयार नसतो. ते आत्मघाताच्या वाटेने निघाले आहेत. 

मला आता माझे लक्ष खेड्यातल्या हजारो-लाखों लोकांकडे वळवायचे होते. ते अजुनही हालअपेष्टा भोगत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती मुळीच बदललेली नाही. पण आता आयुष्य फार थोडे शिल्लक राहिलेले आहे. कोणी तरी पददलित वर्गामधुन माझ्या हयातीतच पुढे येईल आणि माझ्या पश्चात ही चळवळ पुढे चालविण्याची अवजड जबाबदारी पत्करेल अशीही माझी अपेक्षा होती. पण हे आव्हान पेलु शकेल असा कुणीच माझ्या डोळ्यापुढे येत नाही. माझ्या ज्या सहकाऱ्या बद्दल ते ही चळवळ चालवतील असा माझा विश्वास आणि भरवसा होता. ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी एकमेकांत भांडत आहेत. त्यांच्या शिरावर येऊ घातलेली जबाबदारी किती मोठी आहे हे त्यांच्या ध्यानी मनीही असल्याचे दिसत नाही. 

हा देश आणि येथील लोक यांची आणखी काळ सेवा करण्याची संधीही मला हवी होती. ज्या देशातील लोक एवढे जाती ग्रस्त आणि पूर्वग्रह पीडित आहेत तेथे जन्माला येणेही पातक आहे.. 
मी त्यांच्या साठी जे काही मिळवुन देऊ शकलो ते मी एकट्याच्या बळावर मिळवले आहे. ते करताना पिळवटून टाकणाऱ्या संकटाचा आणि अनंत अडचणींचा मुकाबला मला करावा लागला. सगळीकडून विशेषतः हिंदु वृत्तपत्र सृष्टीकडून माझ्यावर शिव्याशापांचा वर्षाव सतत होत राहिला.

जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला, माझ्या स्वतःच्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी गंडवले, त्यांच्याशीही मी दोन दोन हात केले. मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत देशाची आणि पददलितांची सेवा करीतच राहीन. हा काफला (चळवळ) आज जिथे दिसतो तेथे त्याला आणता आणता मला खुप सायास पडले, हा काफला असाच त्यांनी पुढे चालु ठेवावा. वाटेत अनेक अडथळे येतील, अडचणी येतील, अकल्पित संकटे कोसळतील, पण वाटचाल सुरूच ठेवावी.

त्यांना जर सन्मानाने प्रतिष्ठापूर्ण जीवन जगायची इच्छा असेल तर ते आव्हान त्यांनी पेलायलाच पाहिजे. जर माझे लोक, माझे सहकारी हा काफला पुढे नेण्यास असमर्थ ठरलेच तर किमान तो आज जेथे आहे तेथे तरी त्यांनी त्यास राहू द्यावे. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या काफल्यास परत फिरवू नये. हा माझा संदेश आहे. मी तो अत्यंत गंभीरपणे देत आहे. आणि या गांभीर्याला नजरेआड केले जाणार नाही अशी खात्री मला वाटते. 

संदर्भ: डाॅ.बाबासाहेब आंबेडकर:अनुभव आणि आठवणी लेखक-नानकचंद रत्तु – पृष्ठ २२७ – २३०

www.brambekdar.in

हा लेख कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाहोंचवा 

#Share #Forward

जय भीम 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत