BRAmbedkar.in Digital Website
  • Home
  • Audios
  • E-Books
  • Quotes
  • Photos
  • Videos
  • Dhamma
    • Vipassana
    • 5 Precepts [Panchsheel]
    • 22 vows of Ambedkar
  • Social reformers
    • Mahatma Phule
    • Shahu Maharaj
    • Shivaji Maharaj
    • Annabhau Sathe

BRAmbedkar.in Digital Website

बुद्धाचा स्त्रीयासंबंधींचा दृष्टीकोन

  • Uncategorized

बुद्ध स्त्री-पुरुष विषमतेचा समर्थक होता अशा आशयाची मांडणी अधूनमधून काही ब्राह्मणवादी किंवा डाव्या पुरोगामी चळवळीतील स्त्री कार्यकर्त्यांकडून केली जाते. वास्तविकतः अशा प्रकारची मांडणी कॉ, शरद पाटील यांनी प्रथमतः केली. बाकी इतर सर्वजन त्यांची री ओढतात. बुद्धाला स्त्री-पुरुष विषमतेचा पुरस्कर्ता ठरविण्यासाठी बुद्धाने स्त्रियांच्या संघ प्रवेशाला प्रथमतः अनुमती नाकारणे व नंतर जेव्हा अनुमती दिली त्यावेळी प्रव्रजित स्त्री भिक्खुनीना आठ गुरुधम्माच्या अटी बंधनकारक करणे हे एकमेव उदाहरण दिले जाते. या एकाच कारणामुळे बुद्धाला स्त्री-पुरुष विषमतेचा समर्थक ठरविणे म्हणजे ओढून ताणून बुद्धावर स्त्रीयांविषयी अनुदार किंवा पक्षपाती असल्याचे लांछन लावणे होय. बुद्धाचा स्त्रीयासंबंधींचा दृष्टीकोन तपासायचा असेल तर केवळ एकमेव तेही सोयीनुसार अर्थ लावलेल्या उदाहरणावरून नव्हे तर बुद्ध विचाराचे समग्र विश्लेषण करूनच तपासले पाहिजे. या अनुषंगाने बौद्ध साहित्यातील समकालीन संदर्भाच्या आधारे बुद्धाचा स्त्रीयासंबंधींचा दृष्टीकोन स्पष्ट करण्याचा हा प्रयत्न या संदर्भातील निरर्थक चर्चा बंद करण्यास सहाय्यभूत ठरेल.

ज्या धर्मात व्यक्तीच्या स्वातंत्र्याला गौण मानून व्यक्तीचे जीवन ईश्वरी इच्छेनुसार चालत असल्याचा प्रचार केला जातो त्या धर्मात व्यक्तिजिवन नियंत्रित करणारे कठोर धार्मिक कायदे अंमलात आणले जातात.जो धर्म पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचा पुरस्कार करतो त्या धर्माला स्त्रियांवर बंधने लादणारे धार्मिक नियम तयार करावे लागतात. बुद्धाचा धम्म व्यक्तिस्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असल्याने स्त्रियांवरच नव्हे तर एकंदरीत कोणत्याही व्यक्तीवर बंधने लादणारे धार्मिक नियम बुद्धाने उपदेशिले नाहीत.
बुद्धाने निव्वळ स्त्रियांसाठी म्हणून नव्हे तर गृहस्थ आणि गृहिणींनी सुखी जीवनासाठी कसे वर्तन केले पाहिजे याचा उपदेश विविध सुत्तांमध्ये केला आहे.अनाथपिंडिकाची सून सुजाता ही अत्यंत क्रोधिष्ट होती. बुद्ध अनाथपिंडिकाच्या आमंत्रणावरून त्याच्या घरी भोजनास गेले असता सुजाता आपल्या नोकरांना शिवीगाळ करीत असल्याचे बुद्धाने पहिले व तिला योग्य आचरणाचा उपदेश केला. यात बुद्धाने पत्नीचे एकूण सात प्रकार सांगितले आहेत.ते असे :-
1) वधका/वधकभार्या – अशी गृहिणी निर्दय, निष्काळजी, पतीचा अवमान करणारी, परपुरूषाला पसंत करणारी असते.
2) चोरभार्या- अशी गृहिणी पतीने कमावलेले धन उधळणारी असते. आर्थिक व्यवहाराबाबत ती पतीशी अप्रामाणिक असते.
3) अय्यभार्या/स्वामीभार्या – अशी गृहिणी हेकेखोर, अशिष्ट आणि कटु वचन बोलणारी असते. ती आळशी आणि कुटुंबियांवर अधिकार गाजविणारी असते.
4) मातृसमा/मातृभार्या – अशी गृहिणी माता जशी आपल्या मुलाची काळजी घेते त्यापमाणे आपल्या पतीची काळजी घेते. ती कुटुंबाच्या संपत्तीचे काळजीपूर्वक रक्षण करणारी असते.
5) भगिनीसमा/भगिनीभार्या – अशी गृहिणी लहान बहिण ज्यापमाणे आपल्या वडील भावाशी एखाद्या मुद्यावर मतभेद व्यक्त करते त्यापमाणे आपल्या पतीशी प्रेमपूर्वक मतभेद व्यक्त करते. तिच्या मनात आपल्या पतीविषयी राग किंवा कपटवृत्ती नसते.
6) सखीभार्या – अशी गृहिणी आपल्या पतीवर अत्यंत घनिष्ठ मित्रापमाणे पेम करते. ती आपल्या पतीला प्रेमपुर्वक समर्पित असते.
7) दासीभार्या – अशी गृहिणी शांत,अबोल, आज्ञाधारक आणि पतीचे म्हणणे बिनातक्रार मान्य करणारी असते.पतीने कठोर वचनाने तिचा अपमान केला किंवा तिचा दोष नसतांना तिला शिक्षा दिली तरी ती पतीला उलटून बोलत नाही.
यापैकी पहिल्या तीन प्रकारच्या गृहिणी स्वत:च्या तसेच पतिच्या जीवनात दुःख निर्माण करतात.
दुसऱया तीन प्रकारच्या गृहिणी स्वत:च्या तसेच पतीच्या जीवनात सुख निर्माण करतात.
सातव्या प्रकारची गृहिणी पतीच्या जीवनात सुख व स्वतच्या जीवनात दुःख निर्माण करते. (अंगुत्तर निकाय- भाग-4, 91-94).
वरील उपदेशातून बुद्धाचा स्त्रीविषयक दृष्टीकोन अनुदार किंवा पक्षपाती आहे असे जाणवत नाही.

सिगालोवाद सुत्तात आदर्श गृहस्थ कसा असावा याचा उपदेश बुद्धाने केला आहे. यात पतीने पत्नीशी एकनिष्ठतेने वागले पाहिजे.पतीने अथवा पत्नीने विवाहबाह्य संबंध ठेऊ नये, पतीने पत्नीचा अपमान करू नये, पतीने पत्नीच्या सुखासाठी तिला अलंकार व ऐश्वर्य प्रदान केले पाहिजे, पत्नीने पतीच्या संपत्तीचे रक्षण केले पाहिजे, नोकर-चाकराची काळजी घेतली पाहिजे असा गृहस्थधर्माचा उपदेश बुद्धाने सिगालोवाद सुत्तात केला आहे. बुद्धाच्या या उपदेशांचा तत्कालिन सामाजिक जीवनात अत्यंत प्रभाव असल्याचे दिसून येते.यावरूनही बुद्धाचा स्त्रिया बाबतचा दृष्टीकोन स्त्री आणि पुरुष यांना समान मानणारा होता हेच दिसून येते.

स्त्रीला स्व-इच्छेनुसार विवाह करण्याची मुभा ः- वैदिक धर्माने मुलीचा विवाह तीला ऋतुप्राप्ती होण्याच्या आत पित्याने करून द्यावा असे निर्देश विविध स्मृतीद्वारे दिले होते. स्त्रियांना पुनर्विवाह करण्यास, स्वतःच्या मर्जीनुसार अविवाहित राहण्यास बंदी होती. बुद्धाने या रुढींच्या विरोधात उपदेश केला. बुद्धाच्या उपदेशामुळे बुद्धकाळात मुलगा अथवा मुलीच्या विवाहाच्या वयाची कोणतीही अट निश्चित केलेली नव्हती. मुलगा अथवा मुलीचा विवाह साधारणपणे वयाच्या 16 ते 20 व्या वर्षी होत असे, याचे अनेक दाखले मिळतात. प्रसिद्ध बौद्ध उपासिका विशाखा हिचा विवाह 16 व्या वर्षी झाला होता. पुढील आयुष्यात महान थेरी म्हणून प्रसिद्ध झालेली भद्रा कुंडलकेशा ही वयाच्या 17 व्या वर्षीही अविवाहित होती. थेरीगाथेत उल्लेखित अनेक थेरी वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत अविवाहित होत्या. विवाह मातापित्याच्या सहमतीने किंवा मुला-मुलीच्या स्वत:च्या इच्छेनुसार होत असत. थेरी पटाचारा हिने भिक्खुनी बनण्यापूर्वी आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह केला होता. स्त्री-पुरुषांना पुनर्विवाह करण्याची मुभा होती हे थेरी इसादासी हिच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. इसादासी भिक्खुनी म्हणून प्रव्रजीत होण्यापूर्वी तिचे तीन वेळा लग्न झाले होते मात्र तीनही वेळी तिचा विवाह असफल झाल्याचे ती स्वत: थेरीगाथेत नमूद करते. विधवांचा पुनर्विवाह वैदिक धर्माने पूर्णत निषिद्ध ठरविला होता. मात्र बुद्धकाळात विधवा विवाह होत असत हे अन्गुत्तर निकायातील नकुलमाता व जातक कथेतील 67 क्रमांकाच्या कथेतील स्त्रीच्या उदाहरणावरून दिसून येते.हे सामाजिक परिवर्तन बुद्धाच्या उपदेशामुळेच घडून आले.

मुलगा-मुलगी भेद बुद्धाला मान्य नव्हता :- वैदिक धर्माने व्यक्तीच्या मोक्षप्राप्तीसाठी मुलगा आवश्यक ठरविला होता.त्यामुळे मुलगी झाली पण मुलगा झाला नाही म्हणून दुसरा विवाह करणे धर्माने योग्य ठरविले होते.तरीही मुलगा झाला नाही तर सगोत्र कुटुंबातील मुलगा दत्तक घेता येत असे. मात्र कोणत्याही परिस्थितीत गृहस्थाने मुलगी दत्तक घेण्याची मुभा धर्मशास्त्राने दिलेली नव्हती. बुद्धाने मुलगा – मुलगी हा भेद अमान्य केला. कोसल राजा प्रसेनजीत यांच्या मल्लिका नावाच्या राणीच्या पोटी मुलगी झाल्यामुळे दु:खी झालेल्या राजाला उपदेश करताना बुद्धाने मुलगीसुद्धा मुलापेक्षा जास्त कर्तृत्ववान होऊ शकते असे सांगून प्रसेनजीताला दु:खी न होण्याचा उपदेश केला.बुद्धाच्या स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टिकोनामुळे बुद्धकाळात मुला-मुलीत भेद करण्याची व केवळ सगोत्र कुटुंबातील मुलगाच दत्तक घेण्याची वैदिक प्रथा झुगारून देण्यात आली होती असे दिसते. रोगाच्या साथीत अनाथ झालेल्या सामवतीला वैशालीतील मित्त नावाच्या गृहस्थाने दत्तक घेतले होते.तर उकिरड्यावर टाकून दिलेल्या जीवकाला राजपुत्र अभय यांनी दत्तक घेऊन त्यास तक्षशीला विद्यापीठात उच्च प्रतीचे वैद्यकीय शिक्षण घेण्यास पाठविले होते. मातापित्यांच्या मृत्यूमुळे अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व आजी-आजोबा किंवा कुटुंबातील अन्य नातेवाईकांनी केल्याचीही उदाहरणे जातक कथांमध्ये आढळून येतात.

स्त्रियांना संपत्ती धारण करण्याचा हक्क – वैदिक काळातील आपस्तंभ धर्मसूत्रानुसार स्त्रियांना स्वत:ची संपत्ती बाळगण्याचा व या संपत्तीचा विनियोग स्वत:च्या इच्छेनुसार करण्याचा अधिकार नव्हता. बुद्धकाळात मात्र स्त्रियांना स्वत:ची संपत्ती बाळगण्याचा व या संपत्तीचा विनियोग स्वत:च्या इच्छेनुसार करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला होता. होता असे दिसून येते. महाउपासिका विशाखा ही बुद्ध संघाला नियमितपणे भोजन व चीवर दान देत असे. तिने स्वत:च्या संपत्तीमधून संघासाठी संघाराम बांधून दिला होता.भिक्खू संघाला स्वत:च्या संपत्तीमधून दान देणाऱया अनेक उपासिकांची उदाहरणे आहेत. भद्रा कापिलायनी भिक्खुनी म्हणून प्रव्रज्या घेण्यापूर्वी आपल्या स्वत:च्या संपत्तीचे वाटप पती ऐवजी अन्य नातेवाइकाना करताना दिसते. थेरी सुंदरी हिचे वडील भिक्खू बनण्यापूर्वी आपली सर्व संपत्ती आपल्या पत्नीकडे हस्तांतरित करतात.
वरील सर्व उदाहरणे पाहिल्यास बुद्ध हा स्त्री-पुरुष विषमतेचा पुरस्कर्ता होता हा आरोप निराधार असल्याचेच सिद्ध होते.

सुनील खोबरागडे

November 30, 2018 admin

Post navigation

विपश्यना – कामवासना से मुक्ति का वैग्यानिक रास्ता → ← भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow Us on

Rare Video of Dr. Ambedkar

Interview to BBC

Dhamma Diksha Real Vdo

Press News

Pages

  • About Us
  • Audios
  • Contact Us
  • Disclaimer
  • Donars List
  • Donate Us
  • E-Books
  • Manusmruti
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Test player
  • Videos
  • Vipassana
  • Vipassana kyon aur kaise
  • Vipassana patrika sangrah

Categories

  • Ambedkar
  • Buddhist
  • Uncategorized
  • Vipassana Meditation

Recent Posts

  • “हा प्रकाश या पुढे आपल्या समाजाला प्रकाश देण्याचे काम करेल!” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • Dr. Babasaheb Ambedkar Family Tree
  • कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …..
  • बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी..
  • भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..!
Website Developed By Triratnahi-Tech.com